Saturday, August 8, 2009

35. मैत्रिण

Maitrin

मैत्रिण

मैत्रिण माझी बिल्लोरी, बुट्टूक लाल चुट्टुक चेरी
मैत्रिण माझी हूं का चूं!, मैत्रिण माझी मी का तू !

मैत्रिण माझी हट्टी गं, उन्हाळ्याची सुट्टी गं,
मैत्रिण माझ्या ओठांवरची कट्टी आणि बट्टी गं !

मैत्रिण रुमझुमती पोर, मैत्रिण पुनवेची कोर
मैत्रिण माझी कानी डूल, मैत्रिण मैत्रिण वेणीत फूल!

मैत्रिण मांजा काचेचा, हिरवा हार पाचूचा
बदामाचे झाड मैत्रिण, बदामाचे गूढ मैत्रिण

मैत्रिण माझी अशी दिसते, जणू झाडावर कळी खुलते
ओल्या ओठी हिरमुसते, वेड्या डोळ्यांनी हसते

मैत्रिण माझी फुलगंधी, मैत्रिण ञाझी स्वच्छंदी
करते जवळीक अपरंपार, तरीही नेहमी स्पर्शापार

मैत्रिण सारे बोलावे, मैत्रिण कुशीत स्फुंदावे
जितके धरले हात सहज, तितके अलगद सोडावे

मैत्रिण माझी शब्दांआड लपते, हासुनिया म्हणते,
पाण्याला का चव असते, अन् मैत्रिणीस का वय असते

मैत्रिण, थोडे बोलू थांब, बघ प्रश्नांची लागे रांग
दुःख असे का मज मिळते, तुझ्याचपाशी जे खुलते

मैत्रिण माझी स्वच्छ दुपार, मैत्रिण माझी संध्याकाळ
माझ्या अबोल तहानेसाठी मैत्रिण भरलेले आभाळ

32. तुटले

तुटले

आता आठवतायत ते फक्त काळेभोर डोळे...
बाकी सारे आकार, उकार, होकार, नकार...
मागे पडत चाललेल्या स्टेशनांसारखे
मागे मागे जात जात पुसटत चालले आहेत...
पुसत जावेत ढगांचे आकार
आणि उरावं एकसंध आभाळ, तसा भूतकाळ
त्याच्या छातीवर गवताची हिरवीगार कुरणं,
भरून आलेली गाफील गाणी, काळेसावळे ढग
आणि पश्चिमेच्या वक्षाकडे रोखलेले बाणाकृतीतील बगळे
आता आठवतायत ते फक्त काळेभोर डोळे...

बंध रेशमी तुझ्यासवे जे जुळले
अन् क्षितिजावर रंग नवे अवतरले
घन दाटताच एका क्षणात हे रंगबंध विस्कटले...तुटले....

विसरत चाललोय... नावेतून उतरताना आधारासाठी धरलेले हात
विसरत चाललोय होडीची मनोगते, सरोवराचे बहाणे,
वा नावेला नेमका धक्का देणारी ती अज्ञात लाट
ती लाट तर तेव्हाच पुसली... मनातल्या इच्छेसारखी
सरोवर मात्र अजूनही तिथेच...
पण त्याच्याही पाण्याची वाफ किमान चारदा तरी आभाळाला भिडून आलेली
आता तर लाटा नव्हे, पाणी सुद्धा नवंय कदाचित
पण तरीही जुन्याच नावाने सरोवराला ओळखतायत सगळे...
आता आठवतायत ते फक्त काळेभोर डोळे...

क्षण दरवळत्या भेटींचे, अन् हातातील हातांचे
ते खरेच होते सारे..वा मृगजळ हे भासांचे
सुटलेच हात आता मनात हे प्रश्न फक्त अवघडले...तुटले...

तुझ्याकडे माझी सही नसलेली एक कविता...मीही हट्टी...
माझ्याकडे तुझ्या बोटांचे ठसे असलेली काचेची पट्टी
चाचपडत बसलेले काही संकेत, काही बोभाटे...अजूनही...
थोडेसे शब्द, बरंचसं मौन...अजूनही...
बाकी अनोळखी होऊन गेलो आहोत...
तुझा स्पर्श झालेला मी, माझा स्पर्श झालेली तू...
आणि आपले स्पर्श झालेले हे सगळे...
आता आठवतायत ते फक्त काळेभोर डोळे...

मज वाटायाचे तेव्हा हे क्षितिजच आले हाती
नव्हताच दिशांचा दोष, अंतरेच फसवी होती...
फसवेच ध्यास फसवे प्रयास आकाश कुणा सापडले...तुटले...

उत्तरे चुकू शकतात, गणित चुकत नाही...
पावले थकू शकतात, अंतरे थकत नाहीत...
वाळूवरची अक्षरं पुसट होत जातात..
डोळ्यांचे रंग फिकट होत जातात..
तीव्रतेचे उग्र गंध विरळ होत जातात..
शेपटीच्या टोकावरचे हट्ट सरळ होत जातात..
विसरण्याचा छंदच जडलाय आताशा मला..
या कवितांना, शहरभर पसरलेल्या संकेतस्थळांना...
विसरत चालल्या आहेत..पत्ता न ठेवता निघून गेलेल्या वाटा..
विसरत चालले आहे तळ्यावर बसलेले पश्चिमरंगी आभाळ..
अन् विसरत चालले आहे...
आभाळही गोंदायला विसरणारे हिरवेगर्द तळे
आता आठवतायत ते फक्त काळेभोर डोळे...

मी स्मरणाच्या वाटांनी वेड्यागत अजून फिरतो
सुकलेली वेचीत सुमने, भिजणारे डोळे पुसतो...
सरताच स्वप्न अंतास सत्य हे आसवांत ओघळले...तुटले...

आता आठवतायत ते फक्त काळेभोर डोळे...

34. तू

तू

गौरगुलाबी चर्येवर

लालकेसरी टिकली टेकलेली...



लालचुटुक ओठांत

गडद गुलाबी गुपिते मिटलेली....



लालगुलाबी वस्त्रांत

सौम्य गुलाबी कांती लपेटलेली...



मंद गुलाबी गंधाची

एक देहकुपी लवंडलेली...



सभोवताल्यांशी राखलेलं

एक फिकटं गुलाबी अंतर...



तू ?... छे! ... तू नव्हेसचं तू;

तू तर गुलाबच्या फुलाचे भाषांतर !!

31. आयुष्यावर बोलू काही या कवितेमधील सीडी मध्ये नसलेली काही कडवी...

आयुष्यावर बोलू काही या कवितेमधील सीडी मध्ये नसलेली काही कडवी...

I am not sure if all of them are by Sandeep, but most of them are for sure.

कुणीच नाही बोलायाला त्याच्यासाठी
झुकून खाली म्हणते अंबर बोलू काही...

खर्ज बोलतो मनात ठेवून तार तमाशा
'मध्या'मध्ये ठेवूनिया स्वर बोलू काही...

रखरखीत हा रस्ता प्रवास करण्याचा
शेवट त्याचा मिळेल तोवर बोलू काही...

जग बदलाची कशास करता इतुकी घाई
आधी बदलू स्वतःस नंतर बोलू काही...

गल्ली मध्ये बोलायाचे कारण नाही
आयुष्याच्या हमरस्त्यावर बोलू काही...

तुमच्या संगे आज मलाही म्हणूदे गाणे
मिटवून सारे मधले अंतर बोलू काही...

(The following two are most likely not by sandeep...)

स्पर्श जरी हे खरे बोलके असती तरीही
करून मौनाचे भाषांतर बोलू काही...

आभाळातून टपटपणारा थेंब टपोरा
मातीचा दरवळ सुटताना बोलू काही...

31. आयुष्यावर बोलू काही या कवितेमधील सीडी मध्ये नसलेली काही कडवी...

आयुष्यावर बोलू काही या कवितेमधील सीडी मध्ये नसलेली काही कडवी...

I am not sure if all of them are by Sandeep, but most of them are for sure.

कुणीच नाही बोलायाला त्याच्यासाठी
झुकून खाली म्हणते अंबर बोलू काही...

खर्ज बोलतो मनात ठेवून तार तमाशा
'मध्या'मध्ये ठेवूनिया स्वर बोलू काही...

रखरखीत हा रस्ता प्रवास करण्याचा
शेवट त्याचा मिळेल तोवर बोलू काही...

जग बदलाची कशास करता इतुकी घाई
आधी बदलू स्वतःस नंतर बोलू काही...

गल्ली मध्ये बोलायाचे कारण नाही
आयुष्याच्या हमरस्त्यावर बोलू काही...

तुमच्या संगे आज मलाही म्हणूदे गाणे
मिटवून सारे मधले अंतर बोलू काही...

(The following two are most likely not by sandeep...)

स्पर्श जरी हे खरे बोलके असती तरीही
करून मौनाचे भाषांतर बोलू काही...

आभाळातून टपटपणारा थेंब टपोरा
मातीचा दरवळ सुटताना बोलू काही...

29. दूरदेशी गेला बाबा... गेली कामावर आई

दूरदेशी गेला बाबा... गेली कामावर आई
नीज दाटली डोळ्यात , परि घरी कुणी नाही !! ध्रु !!

कसा चिमणासा जीव , कसाबसा रमवला
चार भिंतित धावुन दिसभर दमवला
' आता पुरे ! झोप सोन्या..' कुणी म्हणतच नाही !! १ !!

कशासाठी कोण जाणे देती शाळेमध्ये सुट्टी ?
कोणी बोलायाला नाही...कशी व्हावी कट्टी-बट्टी ?
खेळ ठेवले मांडून ... परि खेळगडी नाही !! २ !!

दिसे खिडकीमधुन जग सारे , दिशा दाही
दार उघडुन तरी तिथे धावायचे नाही
फार वाटे जावे परी - मुठीमध्ये बोट नाही !! ३ !!

नीज दाटली डोळ्यात , परि घरी कुणी नाही
दूरदेशी गेला बाबा......

30. करार

करार
चल आता बोलुन घेऊ ! बोलुन घेऊ थोडे !

सुकण्याआधी माती आणि जाण्याआधी तडे !

संपत आलाय पाऊसकाळ ! विरत चाललेत मेघ !

विजेचीही आता सतत उठ्त नाही रेघ !

मृदगंधाने आवरुन घेतलाय धुंदावण्याचा खेळ!

मोरपंखी पिसर्‍यांनी ही मिटण्याची वेळ !

सावाळ्या हवेत थोडं मिसळ्त चाललंय उन्ह !

खळखळणार्री नदी आता वाहते जपून जपून !



चल आता बोलुन घेऊ ! बोलुन घेऊ थोडे !

लक्षात ठेव अर्थांपेक्षा शब्दच असतात वेडे !

मनामधला कानाकोपरा चाचपून घे नीट !

लपले असतील अजुन कोठे चुकार शब्द धीट !

नजरा, आठवण, शपथा . . . सार्‍यांस उन्ह द्यायला हवे !

जाणयाधी ओले मन वाळायला तर हवे !

हळवी बिळवी होत पाहू नकोस माझ्याकडे

माझ्यापेक्षा लक्ष दे माझ्या बोलण्याकडे

भेटण्याआधीच निश्चित असते जेव्हा वेळ जायची !

समजुतदार मुलांसारखी खेळणी आवरून घ्यायची !

एकदम कर पाठ आणि मन कर कोरे !

भेटलो ते ही बरे झाले ! चाललो ते ही बरे !

मी ही घेतो आवरून सारे ! तू ही सावरून जा !

तळहातीच्या रेषांमधल्या वळणावरून जा !

खुदा-बिदा असलाच तर मग त्यालाच सोबत घे !

' करार पूर्ण झाला ' अशी तेवढी दे !

- मौनाची भाषांतरे, संदिप खरे