Saturday, August 8, 2009

27. सरीवर सर

सरीवर सर…

दूर दूर नभपार डोंगराच्या माथ्यावर
निळे निळे गार गार पावसाचे घरदार
सरीवर सर..

तडा तडा गार गारा गरा गरा फ़िरे वारा
मेघियाच्या ओंजळीत वीज थिजलेला पारा
दूरवर रानभर नाचणारा निळा मोर
मोरपीस मखमल उतू गेले मनभर
सरीवर सर..

थेंब थेंब मोती ओला थरारत्या तनावर
शहार्‍याचे रान आले एका एका पानावर
ओल्या ओल्या मातीतून भिजवेडी मेघधून
फ़िटताना नवे ऊन झाले पुन्हा नवथर
सरीवर सर..

उधळत गात गात पाय पुन्हा परसात
माती मऊ काळी साय हूर हूर पावलात
असे नभ झरताना घरदार भरताना
आले जल गेले जल झाले जल आरपार
सरीवर सर..

अशा पावसात सये व्हावे तुझे येणेजाणे
उमलते ओले रान रान नव्हे मन तुझे
जशी ओली हूर हूर तरारते रानभर
तसे नाव तरारावे मझे तुझ्या मनभर

No comments:

Post a Comment